कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली,(जि.ठाणे)

सांस्कृतिक उपक्रम


वासंतिक संमेलन

वर्षभरातील  कार्यक्रमांची सुरुवात वासंतिक संमेलनाने होते. रविवार दि. १९ एप्रिल २०१५ रोजी ५ वा. ब्राह्मण सभा,दत्त मंदिर, वडवली, अंबरनाथ (पूर्व) येथे यावर्षीचे वासंतिक संमेलन संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम व्यावसायिक श्री. माधव नरहर शिरसाळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ. मृणाल ठाकूरदेसाई यांनी गणेश स्तवनाने केली. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. श्रीकांत ग. हर्डीकर यांनी प्रास्ताविक केले. 


मध्यांतरात उपस्थितांनी "डाळ-पन्ह्याचा" आस्वाद घेतला. या वर्षी "डाळ -पन्हे" संस्थेचे सन्माननिय सभासद श्री. वासुदेव दत्तात्रय पाध्ये यांचे तर्फे दिले गेले याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. श्री विश्वास मेहेंदळे यांच्या "मला भेटलेली माणसे" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुमारे १५० सभासद बंधू-भगिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. रात्री ८. ३० नंतर सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 


दिवाळी पहाट

बुधवार दि. ११ नोव्हेंबर २०१५ रोजी दीपावलीचे औचित्य साधून सकाळी ठीक ७ वा. संस्थेच्या समाजमंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक श्री. विनायक प्रभाकर जोशी यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांचे अत्तर लावून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.


शारदीय संमेलन

रविवार दि. २२ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी ४ वा. ब्राह्मण सभा,पंडितवाडी सभागृह,गान्धी चौक,कल्याण(प.) येथे  शारदीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक श्री. मंदार श्री. हळबे हे उपस्थित होते. मध्यांतरामध्ये दुग्धपान झाले. मध्यांतरानंतर राधाकृष्ण कलामंच आयोजित नाट्यभक्तिरंग हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम अतिशय सुंदर व मंत्रमुग्ध करणारा होता. कार्यक्रमाला १५० सभासद/कुटुंबीय उपस्थित होते. सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


संक्रांत संमेलन

संस्थेचा यावर्षीचा संक्रांत संमेलन सोहळा, शनिवार दि. २३ जानेवारीं २०१६ रोजी, संस्थेच्या समाजमंदिर सभागृहात अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष मा. श्री. शंतनुराव  श्री. भडकमकर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. मंदार  भा. देवस्थळी आणि प्रसिद्ध अस्थिव्यंग तज्ञ डॉ. श्री. जयंत पु. गोखले यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वेदमूर्ती श्री.राजेंद्र भा. भागवत  यांना रु.  ५,०००/-रोख,मानपत्र,शाल व श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. या वर्षी सदरहू  सन्मान कै. वे. मु. दिगंबर र. पाध्ये यांचे स्मरणार्थ श्री. राहुल वि. पाध्ये आणि  कुटुंबीय यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आला. त्याचप्रमाणे डोंबिवलीतील ज्ञातिबांधव  सन्माननीय श्री अजित र.करकरे व  सौ. गौरी अ. करकरे यांचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय  कार्याबद्दल व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय आणि  महाविद्यालयीन परीक्षांमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या ज्ञातीतील विद्यार्थ्यांनाही या  कार्यक्रमात गौरविण्यात आले. मध्यांतरानंतर श्री. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या "नथुराम ते  "देवराम" या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सस्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.  सभासदांचा प्रतिसादही उत्तम होता.


जागतिक महिला दिन -२०१६

संस्थेच्या  जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम शनिवार दि. १२ मार्च २०१६ रोजी  सायंकाळी ५ वा.  संस्थेच्या समाजमंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या  म्हणून "भरारी" या अस्थिव्यंग, विकलांग संस्थेच्या संस्थापिका व कार्यवाह डॉ. सौ. अंजली  आपटे यांना निमंत्रित करण्यात आले होते. "संवाद" या कर्णबधिर मुलांच्या संस्थेतर्फे कार्यरत  असलेल्या सौ. छाया घाटगे यांना सत्कारमूर्ती म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. ठीक ५ वा.  मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ईश स्तवनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ. अनुश्री अ.  नाफडे यांनी केले. श्रीमती उषा वा. कशेळकर यांनी प्रमुख  पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा. अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींचा परिचय सौ. माधुरी श. येल्लापूरकर यांनी करून दिला.  मा. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  शाल,श्रीफळ,  पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार  करण्यात आला. यानंतर सत्कारमूर्तींनी प्रात्यक्षिकासह आपले मनोगत व्यक्त केले.  याच कार्यक्रमामध्ये श्रीमती सोनिया पु. चांदोरकर यांना वास्तुशास्त्र,ज्योतिषशास्त्र, योग्य विद्या  यात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  शाल,श्रीफळ,  पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांचे योग आणि स्त्री या विषयावर  अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मा. अध्यक्षांचे  लेखी भाषण सौ. शुभांगी सु. पुसाळकर यांनी वाचून दाखविले. कार्यक्रमाला महिलांची  उपस्थिती चांगली होती. आभार प्रदर्शन व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


बातमी
रक्तदान - श्रेष्ठदान
श्रद्धांजली
माहिती लवकरच उपलब्ध होईल ..............!!!